कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील मोहरे हलवायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र, आता शरद पवारांनी (Sharad Pawar) फडणवीसांचा हाच खास मोहरा फोडण्यासाठी प्रयत्न  सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटाकडून लढावे,असा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडण्यात आला आहे. महायुतीकडून कागलमध्ये अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित आहे. काल फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात संजयबाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, शरद पवार  गटाकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांच्याशी दोनवेळा संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरु आहेत. स्वत: शरद पवार हेदेखील समरजीत घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, समरजीत घाटगे यांनी अद्याप शरद पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, ते या प्रस्तावाबाबत विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र, समरजीत घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यास हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का ठरले. तसेच यामुळे हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढेल.


समरजीत घाटगे हे शरद पवार गटात का जाऊ शकतात?


समरजीत घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अद्याप शरद पवार गटाच्या ऑफरला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. समरजीत घाटगे यांना आपल्या बाजूला वळवण्याची जबाबदारी शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार गटाच विशेष लक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून समरजीत घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघासाठी गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरु आहेत. समरजीत घाटगे हे फडणवीसांचे निकटवर्तीय असले तरी कागलमधून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणे अवघड दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कागलसाठी समरजीत घाटगे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे समरजीत घाटगे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली होती. यंदाही कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाही समरजीत घाटगे यांच्यावर हात हलवत बसण्याची पाळी येईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 



आणखी वाचा


अजित पवारांना इंदापुरात धक्का! प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश