Satej Patil on Prakash Abitkar: माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठं तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून आणि आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा काँग्रेस गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूरमध्ये नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. 

Continues below advertisement


निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाईल


पाटील यांनी एका सभेमध्ये बोलताना निवडणुकीतील पैशावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला. पाटील म्हणाले की, या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. मात्र, माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे. हलगी आता कुठे वाजू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार आहे आणि या सर्वांचा समाचार आपण या प्रचारांमध्ये घेणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. भ्रष्टाचाराचा पैसा, आरोग्य खात्यातील पैसा कसा वाॅर्डात वाटला जाईल, याची सर्व कागद देणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात काँग्रेस माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये फोडले जात आहेत. इतकेच नव्हे तर सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शारंगधर देशमुख हे सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेससाठी आव्हानात्मक झाली आहे. 


सतेज पाटलांच्या आरोपावर आबिटकर काय म्हणाले?


दरम्यान, सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  सतेज पाटील यांच्याकडूनच मी समजून घेईन आरोग्य विभागामध्ये नेमके काय भ्रष्टाचार झाले आहेत. आम्ही दोघे मिळून ते भ्रष्टाचार बाहेर काढू, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी सांगितले की, आम्हाला लोकांनी संधी दिली आहे ते चांगलं काम करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी नाही. पाटील यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही सामुदायिकपणे भ्रष्टाचार बाहेर काढू. वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आम्ही महानगरपालिका निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहोत, असे ते म्हणाले. 



दरम्यान, अंजली दमानिया यांनी 500 कोटींची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना देण्यावरून हल्लाबोल केला आहे. याबाबत बोलताना आबिटकर म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेले ट्विटचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागामध्ये अशा पद्धतीची कोणतीही अनियमितता नाही झालेली नाही. अंजली दमानिया यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायला हवं, असे दमानिया यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या