Kagal Nagar Parishad: कागलमध्ये सत्तेचा पट अक्षरशः उलथापालथ करणारा राजकीय भूकंप अवघ्या 24 तासांमध्ये झाला आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर, आता कागलमध्येही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित घाटगे हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच छताखाली आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आमनेसामने भिडणारे हे दोन गट कागल नगरपरिषदेला हातात हात घालून प्रचार करणार आहेत. यामुळे “धक्का कोणाला अन् आनंद कोणाला?” हा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासांपूर्वी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. तोपर्यंत पडद्यामागून सूत्र हलवत पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चकवा दिला आहे. चंदगडला भाजपला दूर सारल्यानंतर आता कागलमध्येही त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या आहेत.
संजय घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येणार?
कागलच्या सत्ता समीकरणात एवढ्यावरच थांबायची चिन्हे नाहीत. मुश्रीफ–घाटगे युतीसोबत संजय घाटगे आणि संजय मंडलिक यांच्या एकत्र येण्याचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मुरगुडमध्ये प्रवीणसिंह पाटील भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुहासिनी पाटील शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्या आहेत. तेथे झालेली तडजोड आता कागलमधील समीकरणांवरही परिणाम करताना दिसत आहे.
कागलमध्येही बिनविरोध नगराध्यक्ष?
एकीकडे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकवटले असून भाजपला विरोधात उभे केले आहे; तर मुरगुडमध्ये मंडलिक गटाला नगराध्यक्ष पद देत समझोता साधला गेला आहे. त्यामुळे कागलमध्येही “बिनविरोध नगराध्यक्ष” हा फॉर्म्युला आकार घेताना दिसत आहे. कागल नगरपरिषदेसाठीच्या 23 पैकी 12 जागा मुश्रीफ गटाला मिळत असल्याची चर्चा असून बाकीच्या 11 जागा इतर गटांत वाटल्या जाणार आहेत. जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.
- समरजीत घाटगे गट – 8 जागा
- संजय घाटगे गट – 2 जागा
- मंडलिक गट – 1 जागा
या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे नगराध्यक्ष पदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला. पहिला कार्यकाळ म्हणजे पहिले अडीच वर्षे मुश्रीफ गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु या राजकीय गणितात शिंदे गट म्हणजेच मंडलिक गट काय भूमिका घेणार? त्यांनी पत्ता उलटा टाकला, तर सगळे समीकरण क्षणात बदलू शकते; आणि त्यांनी तडजोड केली, तर कागलमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष निवडीचा “इतिहास” घडेल, अशी चिन्हे आहेत. एकूणात, कागल राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार, हे आता निश्चित झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या