कोल्हापूर : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी मोठा गौप्यस्फोट करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) कोल्हापूरमधील मेळाव्यात बोलताना आमदार सदा सरवणकर यांनी आमदारकीच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावल्याचे म्हटले आहे. जाळ्यात अडकवून उमेदवारी डावलण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा केल्याचा आरोपही सदा सरवणकर यांनी केला. राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राचे भले होईल असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केल्याने त्यांना दसरा मेळाव्यात येऊ दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 


घर पूर्ण जाळून टाका काही शिल्लक ठेऊ नका 


सदा सरवणकर कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, "आमच्या आयुष्यातील गुरु मनोहर जोशी होते. ज्यावेळी मला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी मी मनोहर जोशी यांना विचारले की, उमेदवारी दुसऱ्याला देण्यात येत आहे असं कळलं आहे. त्यावेळी त्यांनी तुझी ताकद दाखवावी लागेल असे सांगितले." 


मात्र, मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली असल्याचे सांगत त्यांच्या घरावर हल्ला करण्यास सांगितले असा उद्धव ठाकरे यांचा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला. त्यामुळे मी मातोश्रीवरुन मनोहर जोशी यांच्या घराकडे शिवसैनिकांचा मोर्चा घेऊन जात असतानाच संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी जाताना वाटेत पेट्रोल पंप लागतो तेथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका काही शिल्लक ठेऊ नका असे फोन करुन सांगितले होते. त्यामुळे मातोश्रीचा आदेश आम्ही पाळला. त्यावेळी गुरु वगैरे काही पाहिलं जात नाही. आम्ही मनोहर जोशींच्या घराकडे पोहोचल्यानंतर त्याठिकाणी कॅमेरे लागले होते. मला प्रश्न पडला मला याठिकाणी येण्यासाठी एक तास लागला तोपर्यंत एवढी तयारी कशी झाली? मात्र आम्ही मातोश्रीचा आदेश पाळला.  


एवढं सगळ करुन तू निवडून कसा येणार? 


सदा सरवणकर पुढे म्हणाले की, "त्यानंतर दुपारी मिलिंद नार्वेकरांनी दुपारी फोन करुन चांगलं काम केल्याचे सांगत उमेदवारी निश्चित असल्याचे म्हणाले. दुसऱ्या दिवशी अकरा मातोश्रीवर येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे समोर होते. संजय राऊत सुद्धा होते. त्यांनी माझ्यासमोर पेपर फेकून हे पेपरात काय आलं बघ म्हणून दाखवले. आमदार सदा सरवणकरांनी मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केल्याचा बातम्या होत्या. मी त्यावेळी म्हणालो की, मला आदेश देण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले एवढं सगळ करुन तू निवडून कसा येणार? तुम्ही सांगितल्याने मी हे सर्व केलं आहे. मी निवडून येऊन दाखवेन. त्यांनी निवडून येत नसल्याचे सांगत पेपर बाजूला करुन निघून गेले. जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केलं नाही."


इतर महत्वाच्या बातम्या