कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (10 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याला सकल मराठा समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. तसेच आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर 19 सप्टेंबरपूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. आज कोल्हापुरात (Kolhapur News) बैठक पार पडली. बैठकीनंतर उद्याच्या दौऱ्यात आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. मात्र, सरकारकडून दिलेला शब्द जर नाही पाळला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद पंडित आणि सकल मराठा समाज यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये केसरकर यांनी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवापूर्वी मंत्रालयात सकल मराठा समाज आरक्षणासाठी तत्काळ बैठकीचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले.


अजित पवारांची उद्या कोल्हापुरात उत्तर सभा


दुसरीकडे, उद्या तपोवन मैदानात होणाऱ्या अजित पवारांच्या सभेसाठी जिल्ह्यातील नेत्यांसह मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्या रविवारी दुपारी साडे तीन वाजता कोल्हापूर शहरातील कावळा नाक्यावर आगमन होईल. तेथून मिरवणुकीने तपोवन मैदानात आणले जाणार आहे. मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत. सभेसाठी कमानी, आणि कटआऊट्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. उत्तर नव्हे, तर उत्तरदायित्व सभा असल्याचा दावा अजित पवार गटाककडून करण्यात येत आहे. आज (9 सप्टेंबर) मंत्री मुश्रीफ यांनी तपोवन मैदानात जाऊन तयारीची पाहणी केली. उद्या होत असलेली सभा फक्त कागलसाठी मर्यादित आहे का? हे तुम्ही उद्याच पाहा, नऊ मंत्री, लाखभर कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार आहेत, असा दावा त्यांनी केला. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला.  कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आणि अस्वस्थता राहू नये, यासाठी सभेचे नियोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 


दरम्यान, सभेसाठी अनेक ठिकाणी कमान आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्यक्ष शरद पवार यांचा फोटो टाळण्यात आलेला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या