Kolhapur-Mumbai Sahyadri Express : पुणे-मुंबई मार्गावर रेल्वे रिकामी धावत असल्याने तोटा होत असल्याचा दावा करत कोरोना महामारीच्या काळात मध्य रेल्वेने बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस (Kolhapur-Mumbai Sahyadri Express) पुन्हा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभाग सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली, त्यात सल्लागार सदस्यांनी सह्याद्री एक्स्प्रेस शक्य नसल्यास किमान पुणे-कोल्हापूर (Kolhapur) किंवा पुणे-बेळगाव (Belgaum) इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी केली.


मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले की, सह्याद्री एक्सप्रेस फेब्रुवारी 2020 पासून बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं रेल्वे तोट्यात चालल्याचा दावा केला होता. त्यामुळे सेवा पुन्हा सुरू करण्यास तयार नाहीत. ही ट्रेन गेली 30-35 वर्षे धावत होती आणि आता ती तोट्यात चालत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ही एक्स्प्रेस गाडी कोल्हापूरहून रात्री 10.50 ला सुटायची आणि सकाळी 7.15 ला पुण्याला पोहोचायची. मग दुपारच्या सुमारास मुंबईला पोहोचत होती. कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांसाठी या वेळा सोयीस्कर होत्या. पुणे-मुंबई दरम्यान ट्रेनला प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाने तिची सेवा बंद केल्याचे बियाणी म्हणाले.


कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला मालवाहू डबे जोडा


दुसरीकडे कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला मालवाहून डबे जोडावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नोव्हेंबर महिन्यात केली आहे. तसेच जेजुरीस भेट देणारे भाविक आणि औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसीमध्ये थांबा द्यावा, अशीही मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पुरंदर विभागातील ताजी फळे आणि भाजीपाला दररोज पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत नेला जातो आणि या बाजारपेठेत आपला शेतीमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना खाजगी वाहतूक वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. 


सुळे (Supriya Sule) यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुका भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथून उत्तम दर्जाच्या ताज्या भाज्या, फळे आणि फुले पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवली जातात, पण कोल्हापूर-पुणे दरम्यानच्या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची वाहतूक खासगी वाहनांतून करावी लागते, जी खूप महाग असते. जर या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडले गेले तर येथील शेतकरी आपला माल या बाजारपेठेत सहज आणि परवडणाऱ्या किमतीत पाठवू शकतील, असेही पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या