Sawkar Madanaik joins BJP: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सावकार मादनाईक कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता सावकार मादनाईक यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना शिरोळ तालुक्यातील राजकारणामध्ये मोठा झटका बसला आहे.
सावकार मादनाईक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ज्यांच्या विरोधामध्ये आजवर संघर्ष केला तर त्यांच्याच मांडीला मांडी लावून सावकार मादनाईक यांचा प्रवास सुरू होणार आहे. आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी यांची भूमिका न पटल्याने मादनाईक नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा फटका बसला होता. 2002 पासून सावकार मादनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमवेत होते. सावकार मादनाईक यांच्या यांच्या भाजप प्रवेशामध्ये माधवराव घाटगे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुंबईमध्ये बैठकही झाल्या होत्या. दुसरीकडे स्वाभिमानीतून सावकार जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपकडून त्यांचा प्रवेश निश्चित झाला.
इतर महत्वाच्या बातम्या