Shaktipeeth Expressway कोल्हापूर : राज्यातील महायुती सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. अशातच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याची चिन्ह असताना या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बंदीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका
पुढे आलेल्या माहितीनुसार, बंदीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनापूर्वी राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. अशातच बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होऊ लागलाय. बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी 86000 कोटीचा चूराडा होणार आहे. तर हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणारे. त्यातच शेतकऱ्यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रान पेटवले आहे.काल (1 जुलै) कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारला पावसाळ्यातही शेतकऱ्यांनी चांगलाच घाम फोडलाय. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी जवळ महामार्ग रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे असा नारा दिला.
....तर गोफनद्वारे ड्रोन फोडू- राजू शेट्टी
दरम्यान यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येणार आहेत त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ रद्द करावा, असं साकडे घालण्यासाठी जाणार आहे. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेत जमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू" असेही शेट्टी यांनी बजावले.
हे ही वाचा