सातबारा जमा केलेले शेतकरी नसतील तर मी राजकारणातून संन्यास घेईन, तुम्ही तयार आहात का? राजेश क्षीरसागरांकडून सतेज पाटलांना चॅलेंज
Rajesh Kshirsagar on Satej Patil: सातबारा जमा केलेले शेतकरी नसतील तर मी राजकारणातून संन्यास घेईन तुम्ही तयार आहात का? असं आव्हान क्षीरसागर यांनी पाटील यांना दिलं आहे.

Rajesh Kshirsagar on Satej Patil: शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रणकंदन सुरू असताना नेत्यांमध्ये सुद्धा चांगली जुंपली आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गावरून एकवाक्यता नसताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि कोल्हापुरात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. पाटील यांच्याकडून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध सुरू असताना क्षीरसागर यांच्याकडून शक्तीपीठ समर्थनासाठी ताकद उभारण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पाटील यांनी शक्तिपीठला समर्थनार्थ शेतकऱ्यांवरून केलेल्या टिकेनंतर आता राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. सातबारा जमा केलेले शेतकरी नसतील तर मी राजकारणातून संन्यास घेईन तुम्ही तयार आहात का? असं आव्हान क्षीरसागर यांनी पाटील यांना दिला आहे.
सतेज पाटील यांनी दिशाभूल करू नये
राजेश क्षीरसागर म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटील यांनी दिशाभूल करू नये. पाटील यांना आता फार काम राहिलेलं नाही. त्यामुळे ते असं बोलत आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व केलेले नेत्यांनी तरी अशा पद्धतीने वागणे योग्य नसल्याचा राजेश क्षीरसागर म्हणाले. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी शंभर कोटी रस्त्यांवरूनही सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की रस्त्यांच्या बाबतीत पाटील यांनी अशाच पद्धतीने टीका केली होती. त्यावेळी देखील मी आव्हान दिलं होतं की, वर्कआउट निघाली नसल्यास मी संन्यास घेईन. आता देखील मी शक्तिपीठ महामार्गावरून आव्हान देत आहे. सातबारा जमा केलेले शेतकरीच असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही
दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात असताना चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मात्र चंदगडमधून पर्यायी मार्ग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्या संदर्भात पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेला आता चंदगड आणि गडहिंग्लजमधील भाजपसह इतर नेत्यांनी एकत्र येत विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठीच शिवाजी पाटील यांनी पत्र दिल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
























