कोल्हापूर : प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून बाथरुरममध्ये पडल्याने त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यानंतर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालावली. पी. एन. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पाटील यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शाहू महाराज यांनी श्रद्धांजली वाहिली. 


जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पी. एन पाटील यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. 


राजकारणापलिकडे मैत्री जपणारे व्यक्तीमत्व हरपले 


दरम्यान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पी. एन. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. शाहू महाराज म्हणाले की, राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली! आमच्या परिवाराचे व त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.


निष्ठावंत व कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला: नाना पटोले


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार पी. एन. पाटील यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक असल्याचे म्हणाले. एक निष्ठावंत आणि कर्तव्यनिष्ठ लोकसेवक काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे पटोले म्हणाले. 


पटोले यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, पी. एन. पाटील यांनी तरुण वयापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 22 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षवाढीत मोठे योगदान दिले होते. 


ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आहेत. जिल्हा बँकेचे संचालक आणि अध्यक्ष, गोकुळ दुध संघाचे संचालक म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले. सहकाराच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. पी. एन. पाटील हे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये रमणारे नेते होते. प्रत्येकाच्या अडचणीच्यावेळी हाकेला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांनी कायमच सर्वसामन्य माणूस केंद्रबिंदू माणून राजकारण केले. राजकारणासोबतच, कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या