KDCC Bank kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- 2019अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, 280 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एक लाख, 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 409 कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 आणली होती. यामध्ये जिल्हा बँकेशी संलग्न एकूण 31,138 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपये कर्जमुक्ती मिळाली होती. त्याचवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर लाभ अनुदान जाहीर केले होते. अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्पीय भाषण करताना अजितदादा पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै 2022 रोजी कृषी दिनाच्या औचित्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा करून तेवढ्या रक्कमेची पुरवणी मागणीही मंजूर करून घेतली होती. दरम्यान; 30 जून 2022 रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत.
संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार येऊन चार महिने झाले आहेत. हे अनुदान आज वाटप होत असल्याबद्दल या सरकारचे स्वागतच आहे. आलेले हे अनुदान 50 टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे. उर्वरित 50 टक्के शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान मिळाल्याशिवाय त्यांचीही दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे, त्यांच्या खात्यावरही दिवाळीपूर्वी तात्काळ पैसे जमा व्हावेत.
यावेळी बँकेचे संचालक आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.