Jayaprabha Studio Kolhapur : राज्याच्या वैभवशाली मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णकाळाची नोंद करणाऱ्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आज स्टुडिओ वाचवण्यासाठी आत्मदहन आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. 


जयप्रभा स्टुडिओ चित्रिकरणासाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, स्टुडिओमधील इमारतीमधील खुली जागा आरक्षित रहावी, व चित्रीकरण सोडून कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, कोल्हापूर मनपाने स्टुडिओ व्यावसायिक तसेच वाणिज्य वापरासाठी देऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे, आदी मागण्यांसाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन गेल्या 251 दिवसांपासून सुरु आहे. 


जग ठप्प असताना स्टुडिओच्या विक्रीचा घाट 


कोरोना महामारीचे संकट देशासह जगावर असताना कोल्हापूरच्या इतिहासातील देदीप्यमान वारसा असलेल्या स्टुडिओच्या विक्री व्यवहार झाल्याने संतापात भर पडली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखांमध्ये हा व्यवहार झाला. जयप्रभा स्टुडिओ विकण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले होते. 3 ऑक्टोबर 2019 रोजी हे काम अतिशय गुप्तपणे पार पडले. त्यानंतर स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले. 13 एकर जागेवर हा स्टुडिओ उभारण्यात आला होता.


हा सारा व्यवहार होताना समग्र कोल्हापूरकर मात्र अंधारात होते. श्री महालक्ष्मी स्टुडिओकडून सचिन श्रीकांत राऊत यांनी हा स्टुडिओ विकत घेतल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या जागेचा कोल्हापूर महापालिका आणि राज्य सरकारने वारस्थळात समावेश केला होता. तरीही हा व्यवहार झाला होता. 


श्री महालक्ष्मी स्टुडिओकडून ही जागा सचिन श्रीकांत राऊत, महेश अमृतलाल बाफना-ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा-संघवी, राजू रोकडे, रौनक पोपटलाल शहा-संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, आदीनाथ शेट्टी यांना विकल्याचे समोर आले आहे. 


जयप्रभाचा इतिहास


जयप्रभा स्टुडिओ ही छत्रपती राजाराम महाराज आणि भालजी पेंढारकर यांची आठवण आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 मध्ये कोल्हापूर सिनेटोन स्थापन केले. चित्रपटसृष्टीला हक्काचे साधन, कोल्हापूरचा विकास हा त्यामागचा उद्देश होता. या कामाची धुरा राजाराम महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे दिली. त्यांनी स्टुटिओचा कारभार भालजी पेंढारकरांकडे दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या