Kolhapur Expansion : कोल्हापूर हद्दवाढ (Kolhapur Expansion) अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हद्दवाढच्या बाजूने आणि विरोधी असलेल्यांशी समन्वय ठेवून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा निर्णय 2024 पूर्वी घेण्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी एका महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. या बैठकीसाठी समर्थक आणि विरोधक प्रतिनिधींनाही बोलवण्यात येईल, हद्दवाढीचा प्रश्न शासनाकडून सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील आणि 2024 पूर्वी शासन याबाबत निर्णय घेईल. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) हद्दवाढीसाठी केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह हद्दवाढ विरोध आणि समर्थक कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


ग्रामीण भागात भेट देणार


हद्दवाढ करण्यात येणाऱ्या ग्रामीण भागालाही आपण भेटी देणार असून त्यांच्याही समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाला मिळणारा निधीही अत्यंत कमी असून हा निधी वाढवून या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा प्राधिकरणामार्फत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही केसरकर यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. शहराचे क्षेत्रफळ खूप कमी असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी केली. तर शहरी व ग्रामीण भागातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी स्वतंत्र बैठका घ्याव्यात. सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावावा, असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.


बैठकीत खडाजंगी 


दरम्यान, हद्दवाढ कृती समितीला जास्त आणि हद्दवाढ विरोधी कृती समितीला कमी वेळ दिल्यावरुन विरोधी कृती समितीने सभात्याग करत जोरदार घोषणा दिल्या. दुसरीकडे, हद्दवाढ समर्थकांनी ‘हद्दवाढ आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ नये व ग्रामीण भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागात चांगल्या पायाभूत सुविधा देत असल्याचे सांगितले. हद्दवाढ कृती समितीच्या काही सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात कोल्हापूर शहराचे क्षेत्रफळ खूप कमी असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यासह अन्य इतर बाबींची माहिती देऊन हद्दवाढ झाली पाहिजे या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली.


इतर महत्वाच्या बातम्या