Kolhapur News : उद्योग विभाग व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सीमाभागातील बेरोजगार मराठी युवक-युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा उद्या (19 फेब्रुवारी) कागलमधील देवचंद कॉलेजमध्ये होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील उमेदवारांनी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, देवचंद कॉलेजमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी ज्या-ज्या विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी ती काळजीपूर्वक व चोखरित्या पार पाडावी, यात कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
मेळाव्यासाठी वाहतुकीची सोय
या रोजगार मेळाव्यासाठी सीमाभागातील किमान आठ ते दहा हजार युवक-युवती उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवचंद कॉलेज ते निपाणी, अर्जुननगर ते निपाणी, गडहिंग्लज ते देवचंद कॉलेज या मार्गावर परिवहन विभागाने शटल रुपाने बस सेवा सुरु ठेवावी. त्याचबरोबर या रोजगार मेळाव्यासाठी कर्नाटक सीमा भागातील युवक-युवतींनी निपाणी येथे यावे. तेथून त्यांना एस.टी. बसेसद्वारे मेळाव्यास्थळी आणण्यात येईल. कागल-05, गडहिंग्लज-06, निपाणी -10 आणि मुरगूड येथून 03 अशा एकूण 24 बसेसद्वारे उमेदवारांची मेळाव्यास्थळी ने-आण करण्यात येईल. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या