Shivsena Thackeray Faction : निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कोल्हापुरात (Kolhapur News) ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. बिंदू चौकात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार केंद्रीय यंत्रणा वापरल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. अरे या निवडणूक आयोगाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 


शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, राज्य सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. यांना देशातील लोकशाही संपुष्टात आणायची आहे. पहिल्यांदाच पक्षावर, संघटनांवर तोडफोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठिशी आहे. दरम्यान, आंदोलनात महिला शिवसैनकही सामील झाल्या होत्या. 


कोल्हापूर शिवसेनेला खिंडार 


एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर कोल्हापुरातून दोन्ही खासदार तसेच एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोल्हापुरात खिंडार पडले आहे. कोल्हापुरात लोकप्रतिनिधी शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे गटात अशी स्थिती झाली आहे. 


कोल्हापुरात शिंदे गटाची कोंडी 


दुसरीकडे, कोल्हापुरात शिंदे गटाची मोठी ताकद असली, तरी भाजपच्या भूमिकेने त्यांची पुरती कोंडी झाली आहे. लोकसभा प्रवास योजनेतंर्गत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आहे. गेल्या महिन्याभरात तीन बडे मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी यांच्यानंतर अमित शाह उद्या (ता.19) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटात असलेल्या संजय मंडलिक आणि धैर्यशील माने भाजपच्या चिन्हावर लढतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्याने ते काय भूमिका घेणार? याकडेही लक्ष असेल. भाजपने सुरु केलेली तयारी पाहता दोन्ही खासदारांना धनुष्यबाण घेऊन ताकद पणाला लावतील याबाबत साशंकता आहे. कोल्हापूर भाजप आणि शिंदे गटात समन्वय नसल्यानेही दोन्ही खासदारांची चिन्हावरुन कोंडी होण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या