Kolhapur Crime : अवघ्या 15 हजार रुपयांच्या कर्जापोटी 50 हजार रुपयांची कर्जाची परतफेड करूनही अश्लील मागणी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या देणाऱ्या चिंचवडमधील खासगी सावकाराला अटक करण्यात आली आहे. योगेश राजगोंडा पाटील (रा. चिंचवड, ता. करवीर) असे या खासगी सावकाराचे नाव असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


खासगी सावकार (Kolhapur Crime) योगेशने राकेश मनोहर मगदूम (वय 38 रा. चिंचवड ता. करवीर) यांना 15 हजार रुपये 10 टक्के व्याजाने दिले होते. राकेश यांनी महिना पंधराशे रुपये याप्रमाणे 10 हजार 500 रुपये परत केले होते. तसेच संशयित योगेशच्या दारू पिण्याचे हॉटेलचे बिल वेळोवेळी 39,750 भागवले होते. असे मिळून 50 हजार 200 रुपये दिले. तरीही योगेश वारंवार कर्जाच्या रकमेबाबत राकेश यांच्याकडे तगादा लावून रक्कम दे नाही, तर जीवे मारू अशी धमकी देत होता. तसेच शरीरसंबंधासाठी नातेवाईक महिलेची मागणी करून छळ केला. 


कोल्हापुरात सावकारी बोकाळली 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गांधीनगरात सावकार बाप लेकाने व्यापाऱ्याच्या मुलाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली होती. पाच लाखांच्या सावकारी कर्जापोटी 32 लाखांची परतफेड करूनही 90 लाखांची मागणी करत कुटुंबासह मारहाण केल्याची घटना गांधीनगरमध्ये घडली. चंद्रकांत पुंडलिक सोनवणे आणि ऋषिकेश चंद्रकांत सोनवणे (रा. चांदणी चौक, रविवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शंकर नामोमल माखीचा (रा. राधे राधे कॉलनी गांधीनगर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. 


कर्जाच्या व्याजापोटी सोनवणे याने माखीजांकडून 32 लाख 60 हजार रुपये वसूल करूनही अजून 90 लाख रुपये येणे बाकी असून ही रक्कम कधी देणार असा तगादा लावला होता. या रकमेच्या बदल्यात 50 लाखांचा गांधीनगरमधील भूखंड नावे करण्याची मागणी सोनवणे करत होता. हा भूखंड नावे का करत नाही? अशी विचारणा करून सोनवणे बाप लेकांनी माखीजा यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा सूरजला मारहाण केली.


गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापुरात (Kolhapur Crime) खासगी सावकारांच्या अरेरावीचा तिसरा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी भागातून मागणी होऊ लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या