Kolhapur Crime : कोल्हापुरात (Kolhapur News) सावकारांची बदमाशी दिवसागणिक सुरुच आहे. पैसे फेडा अन्यथा वेश्या व्यवसाय करण्यास लावू, अशी धमकी महिलेला दिलेली ताजी असतानाच गांधीनगरात सावकार बाप लेकाने व्यापाऱ्याच्या मुलाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. या दोघांविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात (Gandhinagar Police) सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाच लाखांच्या सावकारी कर्जापोटी 32 लाखांची परतफेड करूनही 90 लाखांची मागणी करत कुटुंबासह मारहाण केल्याची घटना गांधीनगरमध्ये घडली. चंद्रकांत पुंडलिक सोनवणे आणि ऋषिकेश चंद्रकांत सोनवणे (रा. चांदणी चौक, रविवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शंकर नामोमल माखीचा (रा. राधे राधे कॉलनी गांधीनगर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
रकमेच्या बदल्यात 50 लाखांचा गांधीनगरमधील भूखंड नावे करण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार माखीचा याचे गांधीनगरमध्ये लोहिया मार्केटमध्ये दुकान आहे. त्याचा मुलगा विकीने व्यावसायाच्या गरजेसाठी चंद्रकांत सोनवणेकडून पाच लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले होते. कर्जाच्या व्याजापोटी सोनवणे याने माखीजांकडून 32 लाख 60 हजार रुपये वसूल करूनही अजून 90 लाख रुपये येणे बाकी असून ही रक्कम कधी देणार असा तगादा लावला होता. या रकमेच्या बदल्यात 50 लाखांचा गांधीनगरमधील भूखंड नावे करण्याची मागणी सोनवणे करत होता. हा भूखंड नावे का करत नाही? अशी विचारणा करून सोनवणे बाप लेकांनी माखीजा यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा सूरजला मारहाण केली.
कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसाय करायला लावू
दुसरीकडे, कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यामध्ये सावकारी किती बोकाळली आहे पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. करवीर तालुक्यातील वडणगेमधील महिलेला कर्जाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडू, अशी धमकी सावकाराने दिल्याचा प्रकार 30 जानेवारी समोर आला होता. घर बांधण्यासाठी घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या बदल्यात सावकाराने 85 लाख रुपयांची मागणी केली होती. दररोज येऊन आपलं प्रापंचिक साहित्य घराबाहेर टाकण्यात टाकले जात असल्याचे पीडित महिलेनं म्हटलं आहे. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेनं सावकारकीतून त्रास दिल्याचा आरोप केला असला, तरी पोलिसांकडे बांधकाम ठेकेदार असल्याचे त्याने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या