कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ(Hasan Mushrif)  जिल्हाध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत (Kolhapur District)  ईडीकडून (ED)  झाडाझडती सुरु आहे.  गेल्या 19 तासांपासून ईडीकडून बँकेत झाडाझाडती सुरु आहे. गेल्या महिन्यात मुश्रीफांच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याच्या एमडी यांना देखील चौकशीसाठी बोलवलं होतं. जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची यावेळी चौकशी करण्यात आली आहे.


काल पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली.


गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप करत वर्षाच्या सुरुवातीला ट्वीट करताना त्यांना यावर्षी हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीने कोल्हापूरमध्ये छापेमारी केली होती, तसेच पुण्यामध्येही छापेमारी केली होती. मात्र, 21 दिवसांपूर्वी झालेल्या छापेमारीचा कोणताही तपशील आतापर्यंत ईडीने सादर केलेला नाही. तोपर्यंत आता पुन्हा एकदा नव्याने छापेमारी केली आहे. 


हसन मुश्रीफ यांनी सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. मागील कारवाईनंतर त्यांनी कट्टर राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्यावर आरोप केला होतात. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी आरोप फेटावून लावले होते. या गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी झालेल्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता, मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. छापेमारीमागे कोलकता कनेक्शन असल्याचे पण म्हटले जात आहे.


बंद पडलेल्या कंपन्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून ते नंतर कारखान्यासाठी वळण्यात आल्याचा आरोप ईडीमधील सूत्रांनी केला आहे. दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक गटातटाचे राजकारण होणाऱ्या कागल तालुक्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. ईडीच्या छापेमारीनंतर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौरा केला होता.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी; कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले