Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह (Kolhapur News) जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तसेच एकतर्फी प्रेमातून छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सुरुच आहेत. याच जाचातून कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता करवीर तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. धमकीचा मेसेज मोबाईलवर पाठवून नंतर संबंधित मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण (Girl Family Threatened) केल्याची घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयीत शंतनू निगडे (वय 22) याने अल्पवयीन मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, असा मोबाईलवर मेसेज पाठवला. त्या मुलीचा पाठलागही केला होता. यानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईकांसह शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली. संबंधित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एकतर्फी प्रेमातून सातत्याने पाठलाग
संशयित शंतनू निगडे (वय 22) अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. परीक्षेला जातानाही तिच्या मागून बाईकने जात पाठलाग करत होता. तसेच मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने मेसेजची माहिती कुटुंबियांना दिली. त्यामुळे कुटुंबियांनी विचारणा केल्यानंतर नातेवाईकांसमवेत मुलीच्या घरात घुसून मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित शंतनू सर्जेराव निगडे, शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापुरात गुन्ह्यांची मालिका
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड करणे, त्रास देणे, कुटुबांना धमकावणे, सोशल मीडियातून बनावट अकाउंट सुरू बदनामी करणे सुरुच आहे. त्यामुळे अशांना जागीच अद्दल घडवण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला कंटाळून 19 वर्षीय मुलीने चुलत्याच्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर एकाच मुलीची 12 फेक इन्स्टा अकाउंट काढून मुलीची बदनामी केल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर पीडित मुलीने तक्रार केल्याने प्रकरणाला वाचा फुटली. मात्र, अशा मानसिक छळाच्या बहुंताश तक्रारी होत नसल्याने आणि बदनामीच्या पोटी सहन केल्या जात आहेत, अशी परिस्थिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या