Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) पन्हाळा (Panhala) तसेच शाहूवाडी (Shahuwadi) या दुर्गम भागातील गावांमध्ये गव्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. शाहूवाडीतील घटनेला एक दिवस होत नाही तोवर पन्हाळा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतात वैरण आणण्यासाठी शेताकङे जात आसताना गव्याने हल्ला केल्याने पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गावात घुसलेल्या गव्याला हुसकावून लावताना हा प्रकार घडल्याचे समजते. 


आज (26 मार्च) दुपारी दोन वाजण्याच्या सूमारास म्हारकी नावाच्या शेतात जणावरांनां वैरण आणण्यासाठी जात असताना गवा मक्क्याच्या शेतात उभा होता. यावेळी गव्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला.  गव्याच्या हल्ल्यात थेट छातीत शिंग घूसल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहीती मिळताच शेजारील शेतकर्‍यानी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मूत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीत प्रचंड वावर वाढला आहे. 


शाहूवाडी तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


आजची घटना ताजी असतानाच काल (25 मार्च) शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली. बंडू बाबू फिरंगे (वय 65 रा. उदगिरीपैकी केदारलिंगवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. फिरंगे नेहमीप्रमाणे बैलांना पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेले होते. यावेळी मागून आलेल्या गव्याने धडक मारून जखमी केले. धडक मारल्यानंतर बैल उधळले तेव्हा गवा जंगलाच्या दिशेने पळाला व फिरंगे जखमी अवस्थेत पडून राहिले. बैल घरी गेल्यानंतर ते घरी आले नाहीत म्हणून घरचे ओढ्याच्या दिशेने गेल्यानंतर फिरंगे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना हाताला, काखेत, डाव्या कुशीत गंभीर जखम झाली आहे. 


वन्यजीवांकडून मोठे नुकसान 


दरम्यान, राजू शेट्टी यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात जंगली जनावरांच्या हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 65 जखमी झाले आहेत. आतापर्यंत 26 हजार 391 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याच कालावधीमध्ये 444 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. मग या सरकारी पाहुण्यांचा किती दिवस पाहुणचार करायचा? राजभवन आणि वर्षा बंगल्यावर असेच जंगली जनावरांचे हल्ले झाले, तर सरकार बघ्याची भूमिका घेईल का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शाहूवाडी तहसिलवर 21 मार्च रोजी मोर्चा काढला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या