Kolhapur Crime : कोल्हापुरात विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली. युवतीने आत्महत्येपूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या असून त्यामध्ये तिने त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी, असे नमूद केले आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात हा प्रकार घडला. 


बोंद्रेनगरात तरुणीने नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केली. नकुशा साऊ बोडेकर (वय 19, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे तिचे नाव आहे. नकुशाने लिहिलेल्या दोन सुसाईड नोटमध्ये तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तर त्रास देणाऱ्या तरुणाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नकुशाच्या नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे सीपीआर आणि करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी झाली होती. 


नातेवाईकांच्या घरात आत्महत्या 


नकुशाने दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती परिसरात घरकाम करून कुटुंबाला मदत करत होती. चार दिवसांपूर्वीच ती नातेवाईकाच्या बोंद्रेनगरमधील घरी आली होती. बुधवारी (15 मार्च) घरी कोणीही नसताना तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने नातेवाईक घरी आल्यानंतर पाहिले असता त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कडी तोडून दरवाजा उघडला तेव्हा नकुशाने आत्महत्या केल्‍याचे दिसून आले. 


पंचनामा करताना दोन सुसाईड नोट सापडल्या


पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करताना त्यांना दोन सुसाईड नोट मिळून आल्या. त्या निळ्या आणि लाल शाईच्या पेनने लिहिलेल्या चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. सुसाईड नोट युवतीच्या हातात मिळाल्या. त्यामध्ये तरुणाने त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख युवतीने केल्याचे दिसून आले.


काय म्हटलं आहे सुसाईड नोटमध्ये?


"एका तरुणामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्याने दिली होती. तो मला सुखाने जगू देणार नाही. त्याच्यामुळेच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करु नका," असे चिठ्ठीत लिहिले आहे. तसेच लाल रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने ‘त्रास देणाऱ्याचे नाव लिहून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे. "माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल," असं म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या