मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Shahu Maharaj)यांनी दिले आहेत. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आत्ताच मी सांगणार नाही, आमच्याकडे मशाल, हात आणि तुतारी पण आहे असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितले.


त्यामुळे कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटली आहे का? आणि सुटली असेल तर ते काँग्रेसकडून की ठाकरे गटाला जागा गेल्यास ठाकरे गटाकडून लढणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शाहू महाराजांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली आहे. ते कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतात याचीच चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये पत्रकार विजय पाटील लिखित 'ब्रेकिंग न्यूज' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शाहू महाराजांनी सूचक वक्तव्य केले होते. आपणास आवश्यक असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराज हेच कोल्हापुरातून उमेदवार असतील हे निश्चित होत आहे. 


काय म्हणाले शाहू महाराज? 


शाहू महाराज यांनी 'ब्रेकिंग न्यूज' ऐषोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागेल. लोकसभा उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेला असं मला कळलं. मी मुंबईला सुद्धा गेलो नाही. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचं असल्याचे ते म्हणाले. ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलवेन, अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे शाहू महाराजही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.


दरम्यान, शाहू महाराज यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार स्वत: आग्रही आहेत. राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी शाहू महाराज यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार यांनी राजवाड्यावर जाऊन महाराजांची भेट घेतली होती.