कोल्हापूर : कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा सुरु असतानाच मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Shahu Maharaj) यांनी मोठं भाष्य केलं आहे. शाहू महाराजांबद्दल आदर असला, तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहू नये, असं आम्हा सर्वांना वाटत होतं, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफ म्हणाले की, शाहू महाराज आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे किंवा नाही आलं पाहिजे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे. शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच रहावे असे वाटते. लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं की कुणाला निवडून द्यायचं ते लोक ठरवतील, असेही ते म्हणाले. 


मला जीवाचं रान करावे लागेल  


मुश्रीफ यांनी सांगितले की, महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावे लागेल. दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करावं लागेल, असेही त्यांनी सांगितले. 
जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांचे लोक ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना देण्याचा ठरलं होतं. जे काय व्हायचं ते दोघांच्या संमतीने होईल, असेही त्यांनी सांगितले. 


सुळकुड पाणी योजनेवर काय म्हणाले? 


मुश्रीफ यांनी सुळकूड योजनेवर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी उद्या (1 मार्च) सुळकुड पाणी योजनेसंदर्भात सर्वच नेत्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलावलं आहे. बैठकीत सविस्तर चर्चा होईल. इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी मिळावं यासाठी सरकारची इच्छा आहे. 


रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मागितला 


कोल्हापुरात शंभर कोटींच्या रस्त्याचं काम सुरू आहे. आणखी उर्वरित रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मागितला आहे. यापूर्वी आयआरबीकडून 50 किलोमीटरचे रस्ते झाले आहेत. बरेच रस्ते आता पूर्ण होतील. हाडाचे दवाखाने बनवायची काहीही गरज नाही, आपण रस्ते गुळगुळीत करू, असे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्य बातम्या