कोल्हापूर : कोल्हापूरचे (Kolhapur News) शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या लोकसभेवर (Kollhapur Lok Sabha) भाजपने दावा केला असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या (BJP) चिन्हावर लढावं लागेल अशीही चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी खुलासा करताना धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे म्हटलं आहे.
शाहू महाराजांना नेहमी वडिलांच्या समान मानतो
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या उमेदवारीची चर्चा शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना संजय मंडलिक म्हणाले की, शाहू महाराजांना नेहमी वडिलांच्या समान मानतो. आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. मात्र, निवडणुकीमध्ये समोर कोण आहे हे मी पाहिलेले नाही, असेही म्हणाले.
अमित शाहांच्या भेटीवर काय म्हणाले
अमित शाहांच्या भेटीवर संजय मंडलिक यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, अमित शाह यांना मी पक्ष प्रवेश केला त्यावेळी भेटलो होतो. त्यानंतर कधीही भेटलो नाही. शिंदे साहेब आमचे पक्षाचे सक्षम नेते आहेत, त्यामुळे अमित शाह यांना भेटलो नाही असे ते म्हणाले. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या दाखला देत संजय मंडलिक म्हणाले की, 2009 मध्ये शरद पवार विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी तरुणांना संधी म्हणून शरद पवारांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना डावलले होते. आताच्या निवडणुकीतील कोल्हापूरकर आमच्या बाजूने उभं राहतील, असं संजय मंडलिक म्हणाले.
चिन्ह बदलायला सांगितलं, केवळ अफवा
संजय मंडलिक म्हणाले की, 13 खासदांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्ही एकूण 23 जागांची मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही भेटत नाही, चिन्ह बदलायला सांगितलं आहे या केवळ अफवा असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेा शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहे त्याठिकाणी लढतील, उलट आम्ही 23 जागांची मागणी केली आहे असे ते म्हणाले.
दरम्यान त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला निधी मिळत नव्हता. दोन्ही काँग्रेसला जास्त निधी देण्यात येत होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची नाराजी वाढत गेली. आम्ही शिंदे साहेबांना बॅकलॉग भरून काढणार का असे विचारून सोबत गेलो होतो. त्यानुसार मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांनी निधी दिल्याचे संजय मंडलिक म्हणाले. दरम्यान गेल्या पाच वर्षांमध्ये काय केलं हे सांगण्यासाठी मी मतदारसंघाचा दौरा करत असल्याचे संजय मंडलिक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या