Maharashta Loksabha Election Update : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 11 जागांचा यामध्ये समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाचा अपेक्षित आकडा न गाठता आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावाती प्रचार करण्यात आला.
बारामतीमध्ये पहिल्या चार तासांमध्ये थंडा प्रतिसाद
आज राज्यातील, लातूर, सांगली, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, उस्मानाबाद (धाराशिव), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सातारा आणि सोलापूर या 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत रंगली आहे. कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना आहे.
11 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस बारामती आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. मात्र, बारामतीमध्ये पहिल्या चार तासांमध्ये मतदानासाठी थंडा प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. अकरा वाजेपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अवघ्या 14.64 टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र, कोल्हापूरमध्ये 23.77% मतदानाची नोंद झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये 21.19 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदानाची नोंद झाली.
माढामध्ये पहिल्या चार तासांमध्ये 15.11 टक्के मतदानाची नोंद
माढामध्ये सुद्धा बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असाच सामना रंगला होता. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात घेतलेली तुतारी यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मात्र, पहिल्या चार तासामध्ये त्याचा परिणाम मतदानामध्ये झालेला दिसून आलेला नाही. माढामध्ये पहिल्या चार तासांमध्ये 15.11 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकहाती प्रचार केला. महायुतीकडू पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील मंत्री प्रचारासाठी लागले होते. त्यामुळे या 11 मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक प्रचार करण्यात आला होता. यासाठी गल्ली ते दिल्ली अशी सूत्रे हलली होती.
इतर महत्वाच्या बातम्या