Lumpy Skin Disease : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नोंदणीकृत 100 टक्के गायी आणि बैलांचे लसीकरण पूर्ण झाले असून या लसीकरणामुळे त्यांना लम्पी चर्मरोगापासून संरक्षण मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2.83 लाख तर सांगली जिल्ह्यातील 2.79 लाख गायी व बैलांना तीन आठवड्यात लसीकरण करण्यात आले आहे. गाय आणि बैल दोन आठवड्यात संसर्गाची प्रतिकारशक्ती विकसित करतात, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. यादरम्यान संसर्ग झाला, तरी लसीकरणामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त वाय. ए. पठाण म्हणाले की, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत गायी आणि बैलांचे 100 टक्के लसीकरण केले आहे. लसीकरणानंतरही पुढील प्रसार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना विलगीकरण नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही ते म्हणाले.
मंगळवारी जिल्ह्यात दररोजमधील सर्वाधिक प्रकरणे समोर आली. जिल्ह्यात 320 बाधित आणि 12 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, जी एका दिवसातील सर्वाधिक आहे. दरम्यान, बाधित प्रकरणांची संख्या नक्कीच कमी होत असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात म्हशी व इतर जनावरांसाठी गुरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाही वाहतूक बंदी कायम आहे. मेंढ्या आणि शेळ्यांच्या व्यापारासाठी बाजार खुले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात, गायी आणि म्हैस या दोन्हींच्या वाहतुकीवर बंदी कायम आहे, तसेच गुरांच्या बाजारातही असल्याचेही पठाण म्हणाले.
ऊसतोड मजुरांना पशुधनाचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत येणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या मालकीच्या पशुधनाचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये पशुधन आणण्याच्या 14 ते 21 दिवस आधी लसीकरण केले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात गळीत हंगामासाठी मराठवाडा आणि कर्नाटकातून लाखो ऊस मजुरांची आवक होते.
गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो चार महिने चालणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोगाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. गायी आणि बैलांच्या मृत्यूची संख्या देखील जास्त आहे.
इतर महत्वाच्या बातम्या