Kolhapur News : महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर खोडसाळपणे पसरविले जात आहे. ही अफवा आता कुरुंदवाडमध्ये येऊन ठेपली आहे, शहरात असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने पालकातून खळबळ उडाली आहे.


जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात सध्या असा कोणताही प्रकार कोठेच नाही, यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. येथील शिक्षण संस्थाचालकांनी हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या अफवेचे पोलीस प्रशासन तपास करत आहे. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे पालकातून भीतीचे वातावरण पसरले आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात अशी कोणतीही घटना नाही 


जिल्ह्यात अशी घटना कोठेही घडली नसून, लहान मुलांना पळवून नेण्याची केवळ अफवा आहे. कुरुंदवाड शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातंर्गत पोलिसांची दिवसरात्र पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तरीही आपल्या परिसरात आवारात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, किंवा परिसरातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे. 


कोणीही सोशल मीडियावर आलेले चुकीचे मेसेज खातरजमा न करता पुढे पाठवू नयेत. अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कुरुंदवाड पोलिसांची धावपळ


मंगळवारी सायंकाळी 112 या हेल्पलाईन नंबरवर अब्दुललाट येथून एकाने फोन करून एका मुलीला कर्नाटक राज्याच्या दिशेने वडगिरी रस्त्याकडे अपहरण करून नेत असल्याची माहिती दिली होती. सपोनि बालाजी भांगे व पोलीस कुमकसह घटनास्थळी दाखल झाले.मात्र तपासाअंती ही माहिती चिकीची असल्याचे निदर्शनास आले.


शिक्षण प्रसारक मंडळाच्या चंद्रकला बालक मंदिर,एस.पी हायस्कूल, खंडेराव माने हायस्कूल व इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची बातमी काही माध्यमांच्या माध्यमातून पसरवली आहे, ती निव्वळ अफवा आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तरीही पालकांना आम्ही योग्य त्या सूचना देऊन मुलांना शक्य असल्यास आणून सोडावे व शाळा सुटल्यानंतर परत न्यावे असे आवाहन केले असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा.शरद पराडकर यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या