Shivadi Assembly constituency : शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivadi Assembly constituency ) निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी स्वत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांना फोन करुन तातडीनं मातोश्री निवासस्थानी बोलावलं आहे. दुसरीकडे लालबागमध्ये साळवींच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमली आहे. सुधीर साळवी आणि माजी नगरसेवक हे मेळाव्यापूर्वी मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी यांना उमेदवारी
शिवडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजय चौधरी हे शिवडीचे विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, शिदेंनी ठाकरेंविरोधात भूमिका घेतल्यानंतर अजय चौधरी यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवडीमधून इच्छुक असलेल्या सुधीर साळवींना मैदानात न उतरवता पुन्हा एकदा अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सुधीर साळवींचा आज मेळावा पार पडणार
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी शिवडीतून ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी शिवडीचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच मैदानात उतरवण्यात आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी शुक्रवारी म्हणजे आज (दि.25) संध्याकाळी समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, या मेळाव्यापू्र्वी खुद्द उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना फोन केला आहे. अजय चौधरी यांच्याविरोधात बंड होऊ नये, यासाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.
लालबागच्या मार्केटमध्ये पार पडणार सुधीर साळवांचा मेळावा
सुधीर साळवी गेल्या काही महिन्यांपासून शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी करत होते. गणेशोत्सवादरम्यान, त्यांनी लालबागचा राजाच्या पायाशी सुधीर साळवी यांच्या नावाने भावी आमदार अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती,त्यानंतर सुधीर साळवींच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, निष्ठेच्या मेरीटवर उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींना मैदानात उतरवलं आहे. सुधीर साळवींनी वेगळा निर्णय घेतल्यास अजय चौधरींविरोधात कडवे आव्हान उभं राहू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींची दिलजमाईची करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या