Kolhapur Rains : एकीकडे राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होऊन पूरस्थिती निर्माण झाली असताना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे काही धरणं भरली असून काही धरणं भरण्याच्या वाटेवर आहेत. यातच कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण (Radhanagari Dam) 100 टक्के भरलं आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) पाण्याची चिंता मिटली आहे.
धरणातून 3028 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा
राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा आज पहाटे साडेपाच वाजता उघडला दरवाजा. या दरवाज्यातून प्रतिसेकंद 1428 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तर दुसरीकडे पॉवर हाऊसमधून 1600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. सध्या राधानगरी धरणातून एकूण 3028 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. खबरदारी म्हणून भोगावती नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे देखील उघडण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरण - स्वयंचलित दरवाजे असलेलं देशातील पहिलं धरण
दरम्यान स्वयंचलित दरवाजे असलेलं राधानगरी हे देशातील पहिलं धरण आहे. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलं आहे. याच धरणावर अर्ध्या जिल्ह्याची शेती फुलली आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवडला. या धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो. ज्यावेळी राधानगरी धरण 100 टक्के भरेल, त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो.
पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली
यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदीने (Panchganga River) पहिल्यांदाच इशारा पातळी गाठली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 8 इंच इतकी आहे. त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 71 बंधारे पाण्याखाली गेले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.