Maharashtra Cabinet Expansion : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ तब्बल 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झाला आहे. त्यामुळे वाऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाकडून प्रत्येकी 9 अशा 18 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  


भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  


दोन्ही गटाकडून पहिल्या टप्प्यातील विस्तार करताना प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. दरम्यान, किमान 18 जणांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदावरून चर्चा सुरु झाली आहे. शपथबद्ध झालेले सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे यांच्यामध्येच राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद विभागून दिले जाण्याची शक्यता आहे.


चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्रिपद होण्याची शक्यता


पश्चिम महाराष्ट्रातून भाजपकडून अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तर सांगलीमध्ये चारवेळा निवडून आलेल्या सुरेश खाडे (Suresh Khade) यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरकर असलेल्या चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील सध्या कोथरुडचे आमदार असल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातून विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. विरोधकांकडून त्यांना नेहमीच त्यांच्या हिमालयात जाण्यावरून डिवचले जाते. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारून विरोधकांची तोंडे बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला बळकटी देण्याचे आव्हान


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून गेली आहेत. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षित धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. त्यामुळे कोल्हापूरमध्ये महाडिक गटाच्या मदतीने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला, पण मिळालेली नक्कीच त्यांचा आत्मविश्वास दुणावणारी आहेत. 


कोल्हापूर मनपासह जिल्ह्यातील सहा नगरपालिका, जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास चंद्रकांत पाटील यांनाच पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल यात शंका नाही. पुण्याचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. 


सुरेश खाडे सांगलीचे पालकमंत्री शक्य


सांगली जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार सुरेश खाडे यांना पक्षाने निष्ठेचे फळ देताना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सांगली जिल्ह्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात 2019 मध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. सुरेश खाडे यांना आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातून भाजपकडून आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुधीर  गाडगीळ यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस होती. मात्र, अंतिम टप्प्यात आमदार सुरेश खाडे यांनी बाजी मारली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या