Kolhapur Police: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने दाखववेल्या कर्तव्य तत्परतेनं कार चालवत असताना अत्यवस्थ झालेल्या इसमाचा जीव वाचला आहे. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार बाबासाहेब कोळेकर (बक्कल नंबर 434) यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं कौतुक करण्यात येत आहे. अत्यवस्थ अवस्थेत मुळीक यांना आधार हॉस्पिटलमधे दाखल केले. रक्तातील साखर वाढल्याने आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना त्रास सुरू होता. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या जीविताचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 


काय आहे संपूर्ण प्रकार?


बाबासाहेब कोळेकर कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल याठिकाणी कर्तव्य बजावत होते. कर्तव्य बजावत असताना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक मारुती कार रस्त्यावर येऊन थांबली. त्या कारमधून एक महिला मोठ्याने ओरडत असल्याचे कोळेकर यांनी पाहिले. कोळेकर यांनी कारजवळ जावून पाहिले असता कार चालक विलास मुळीक (रा. क्रशर चौक, कोल्हापूर) स्टिअरिंग धरून गप्प बसल्याचे दिसून आले.


20 मिनिटातच आधार हॉस्पिटलमधे दाखल केले


हवालदार कोळेकर यांनी काय झालं याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या डोळ्यावर अंधारी आल्याचे सांगत गाडी चालवता येत नसल्याचे म्हणाले. माझी गाडी तुम्हीच चालवा असे सांगितले. कारचालक मुळीक असमर्थ असल्याचे आणि त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कोळेकर यांनी स्वतःच कार चालवत सुमारे 20 मिनिटातच आधार हॉस्पिटलमधे दाखल केले. 


मुळीक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमधे आले. पोलिस हवालदार कोळेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. "तुम्ही देवा सारखे धावून आलात, तुम्ही खाकी वर्दीतील देव माणूस आहात" अशी प्रतिक्रिया दिली. काही वेळानंतर कोळेकर हे पुन्हा त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या