Kolhapur News: जन्मदात्या आई वडिलांना बेदखल करण्याचा करण्याचा उद्योग सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील उंदरवाडीमध्ये आईची मृत्यूनंतर पालखीतून अंत्ययात्रा काढत इच्छा पूर्ण केली आहे. आईची इच्छा लेकानं पूर्ण केल्याने पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे. उंदरवाडीमधील भगिरथी शिवाजी पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी पालखीतून अंत्ययात्रा काढण्याची इच्छा मुलगा मारुती यांच्याकडे बोलून दाखवली होती. विशेष म्हणजे आईने बोलून दाखवलेली इच्छा पूर्ण करत त्यांनी पालखीतून अंत्ययात्रा करत अखेरचा निरोप दिला. भगिरथी पाटील या उंदरवाडीच्या सरपंच अनिता पाटील यांच्या सासू व सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांच्या मातोश्री होत. 


आईची इच्छा आणि पालखी तयार करून घेतली 


मारुती पाटील यांच्या आई भगिरथी यांनी वर्षापूर्वी अंत्ययात्रा पालखीतून काढावी, अशी इच्छा मुलाकडे बोलून दाखवली होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मारुती पाटील सरवडेमध्ये सुतार बंधूंकडे पालखी तयार करण्यासाठी दिली होती. त्यामुळे पालखी एक वर्षापासून तयार होती. आईचे वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी  घरी तयार असलेल्या पालखीतून अंत्ययात्रा काढली.


आईच्या उपकाराची जाणीव


अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून आईने पालनपोषण केल्याची जाणीव असल्याने मारुती पाटील यांनी आईच्या म्हातारपणात होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या. काही दिवसापूर्वीच नातेवाईकांना बोलावून आईचे पाद्यपूजन कार्यक्रम केला होता. निधनानंतर सुद्धा पालखीतून अंत्ययात्रा काढणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार पालखीतून निरोप दिल्याचे मारुती पाटील यांनी सांगितले.


वाहतूक पोलिसाने स्वत: स्टिअरिंग हाती घेत वाचवले प्राण


कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने दाखववेल्या कर्तव्य तत्परतेनं कार चालवत असताना अत्यवस्थ झालेल्या इसमाचा जीव वाचला आहे. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार बाबासाहेब कोळेकर (बक्कल नंबर 434) यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं कौतुक करण्यात येत आहे. अत्यवस्थ अवस्थेत मुळीक यांना आधार हॉस्पिटलमधे दाखल केले. रक्तातील साखर वाढल्याने आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना त्रास सुरू होता. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या जीविताचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हवालदार कोळेकर यांनी काय झालं याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या डोळ्यावर अंधारी आल्याचे सांगत गाडी चालवता येत नसल्याचे म्हणाले व माझी गाडी तुम्हीच चालवा असे सांगितले. कारचालक मुळीक असमर्थ असल्याचे व त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कोळेकर यांनी स्वतःच कार चालवत सुमारे 20 मिनिटातच आधार हॉस्पिटलमधे दाखल केले. 


इतर महत्वाच्या बातम्या