Kolhapur News : जयप्रभा स्टुडिओ खरेदीवरून कोल्हापुरात (Kolhapur News) शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता दिवसागणिक अधिक टोकदार होत चालला आहे. दोन्ही गटाकडून गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून जयप्रभा स्टुडिओ प्रकरणात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आता शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


संजय पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, असे निवेदन शिंदे गटाच्या महिला आघाडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलं आहे. माजी नगरसेवक संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात कोट्यवधींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे. एका व्हिडीओ गेम पार्लरवर एवढी संपत्ती कशी मिळवली? असा संशय व्यक्त करत संजय पवार हे व्यापाऱ्यांना धमकी देवून हप्ते गोळा करतात असा गंभीर आरोप यावेळी महिला आघाडीने केला. संजय पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे. 


राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा


दरम्यान, राज्य सरकारच्या ताब्यातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार संस्थानकालीन अटी व शर्तींचा भंग करून झाला आहे. 50 कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली? याची चौकशी करून जागेच्या व्यवहारातील प्रमुख राजेश क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करावी, तसेच एक साधा पानपट्टीचालक असलेल्या राऊत यांनी साडेसहा कोटींची रक्कम कोठून आणली, याची ‘ईडी’ने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे. नगरविकास विभागाने महापालिकेला स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात दिलेले पत्र चुकीचे व बेकायदेशीर असल्यामुळे स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही घाईगडबडीने करण्यात येऊ नये. माझी त्यास हरकत आहे, अशा आशयाचे लेखी पत्र इंगवले यांनी जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहुल रेखावार यांना दिले आहे. 


पन्नास कोटींची जागा साडेसहा कोटींमध्ये कशी घेतली, पानपट्टी चालविणाऱ्या सचिन राऊतने एवढी रक्कम कोठून आणली? आयटी रिटर्न तरी भरले आहेत का? हे राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकात येऊन पटवून सांगितले, तर मी माफी मागतो आणि या वादातून माघार घेतो, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या