Kolhapur Municipal Corporation : गेल्या महिन्याभरापासून बालाजी पार्क, माढा कॉलनी परिसरातील इतर काॅलन्यांमध्ये पाण्याचा पूर्णतः ठणठणाट असल्याने आज संतप्त महिला आणि नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून पाणी आलं नसल्याने महिलांनी रस्त्यावर टायर टाकून आणि घागरी हातामध्ये घेऊन आंदोलन केले. यावेळी महिला महापालिकेतील अधिकाऱ्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या. महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढताना तोंड बघून पाणी सोडत सोडत असल्याचा आरोप केला.
दिवाळी झाल्यापासून पाण्याच्या प्रश्न गंभीर झाल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तो पुरेसा नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही काम धंदा सोडून दररोज पाण्यासाठी धावाधाव करायची का? अशी विचारणा महिलांनी केली.
माढा काॅलनी, शाहू काॅलनी, बालाजी पार्क, गुरु महाराज नगरी, स्वामी समर्थ अपार्टमेंट, आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. गेल्या महिन्याभरापासून आम्ही पाणी विकत घेत असून, आमचे हातावरचे पोट असल्याने आम्ही दररोज पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाही, अशी भावना आंदोलन करणाऱ्या नागरिक आणि महिलांनी व्यक्त केली. जर आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर निवडणुकीला भागात येऊ देणार नाही, अशी धमकीच यावेळी महिलांनी दिला. आंदोलनामध्ये तब्येत बरी नसताना सलाईन लावून, औषधे खाऊन या ठिकाणी उभे असल्याची भावना काही महिलांनी यावेळी व्यक्त केली. जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. भागातील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी या आंदोलनाबाबत पूर्वकल्पना दिली होती, असे म्हणाले.
पाण्याचा प्रश्न सुरळीत नाही झाला, तर आम्ही न कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन करू असं स्पष्टपणे सांगितल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. जोपर्यंत महापालिका आयुक्त या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जर आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला येऊन समोर सांगावे, आम्ही आमचं काय ते बघू, मात्र, आमच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा यावेळी संतप्त महिलांनी केली. जर आमच्या पाणी प्रश्न सुटला नाही, तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा भागातील महिलांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या