Kolhapur News : चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झालेल्या अविवाहित जवानाने सुट्टीवर घरी आल्यानंतर गळफास घेत आत्महत्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात सन्नाटा पसरला आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय 23) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी तनवडीमध्ये (ता.गडहिंग्लज) गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. वयाची पंचविशीसुद्धा पार न केलेल्या आणि चार वर्षांपासून देशाच्या सेवेत असणाऱ्या मुलाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. पुण्यातील 109 इंजिनिअरिंग रेजिमेंटमधून ते लष्करात भरती झाले होते. 


शेतात कुटुंबासोबत जेवण करून घरी आल्यानंतर टोकाचे पाऊल


शिवानंद आरबोळे गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. सध्या ते राजस्थानमधील कोटामध्ये कर्तव्यावर होते. अविवाहित असलेल्या शिवानंद लग्नाच्या बेताने 15 दिवसांपूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. कुटुबीयांकडून लग्नासाठी स्थळ पाहण्यात येत होती. त्यांचे मोठे बंधूही लष्करात कार्यरत असून ते सुद्धा सुट्टीवर आले आहेत. रविवारी शिवानंद कुटुंबीयांसोबत शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच सर्वांसोबत जेवण केले होते. त्यानंतर अंघोळ करायला जातो म्हणून ते घरी निघून आले. घरी आल्यानंतर त्यांनी नाॅयलाॅन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आई वडिलांसह भाऊ सायंकाळी घरी आल्यानंतर शिवानंद यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता. 


वर्षातील दुसरी घटना


कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र कायम असले, तरी जवानाने असा निर्णय घेण्याची वर्षातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी, पन्हाळा तालुक्यातील काखे गावामध्ये सत्यजीत खुडे या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर घरीच आत्महत्या केली होती. सत्यजीत महादेव खुडे (वय 28) भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. 1 जानेवारीपासून ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते. 19 जानेवारी रोजी सत्यजीत दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास भाऊ सुनील हा सत्यजीत यांना उठविण्यासाठी गेले असता गळफास घेतल्याचे निदर्शनास आले होते.  


मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी काँग्रेस पन्‍हाळा तालुका शाखेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर यांनी दिली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :