Raju Shetti: मणिपूरसह देशातील महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) इचलकरंजी शहरात अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. तीन दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावली असल्याची माहिती इचलकरंजीमधील आयजीएम रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर सलग तीन दिवस झालेल्या अन्नत्यागामुळे युरिनमध्ये अतिरिक्त कीटोनचे प्रमाण वाढल्याने डिहायड्रेशन, थकवा, ताप येवून शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे रात्री ऊशिरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कँडल मार्च 


दरम्यान, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये मणिपूरसह देशात होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ बुधवारी संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी इचलकरंजी शहरातील शेकडो महिलांनी कँडल मार्चमध्ये सहभागी होत संताप व्यक्त करण्यात आला. पाऊस असतानाही महिला सहभागी झाल्या. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास कँडल मार्चला प्रारंभ झाला. शिवतीर्थावरून मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आला. यावेळी पावसाच्या सरी कोसळत असतानाही मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये प्रताप होगाडे, सदाभाऊ मलाबादे, सौरभ शेट्टी, प्रसाद कुलकर्णी, दिलीप जगोजे, अण्णासाहेब शहापुरे पद्माराणी पाटील, आदींसह शेकडो महिला आणि नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. 


मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा गाठली गेली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.


इतर महत्वाच्या बातम्या