कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघ पोरका झाला होता. या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोण रिंगणात उतरणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, आता पी एन पाटील यांच्या समर्थकांनीच हा प्रश्न निकालात काढला आहे. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे करवीरमधून कोण लढणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली होती, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांचे धाकटे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. थोरले चिरंजीव राजेश पाटील यांना जिल्हा बँकेत संधी दिली जाणार आहे. 


गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पश्चात कोण? अशी चर्चा रंगली होती. मात्र, समर्थकांनी मेळावा घेत हा प्रश्न निघाली काढला. पाटील समर्थकांचा वाकरे फाट्यावरील विठाई चंद्राई लॉनवर भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमचे पालकत्व घ्यावे व करवीर विधानसभा लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला. समर्थकांनी राहुल व राजेश पाटील या दोन बंधूंपैकी कोणीही विधानसभा लढवण्याचा निर्णय घ्यावा, असेही यावेळी ठरले. यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ हा निर्णय पाटील कुटुंबाला कळवला. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजेश पाटील यांनी राहुल हेच पी एन पाटील यांच्या विधानसभा राजकारणाचे वारसदार असल्याचे सांगितले आणि तेच विधानसभा निवडणूक लढवतील असेही जाहीर केले. 


लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी आपलीच उमेदवारी समजत करवीर विधानसभा मतदारसंघातच नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झंझावाती प्रचार केला होता. मात्र. 19 मे रोजी राहत्या घरी ते पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. यानंतर पाच दिवस त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, 23 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यामुळे जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खंबीर नेतृत्व गेल्याची भावना जिल्हा काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या