कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर कागलमध्ये मंडलिक यांना अपेक्षित मतदान झालं नसल्याचं समोर आलं आहे. संजय मंडलिक यांचं होम पिच, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे बाजूला असतानाही संजय मंडलिक यांना कमी मतदान झालं आहे.
कमी मतदान कोणामुळे यावरून हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर सुरू झालं आहे. राजेंनी राजेंना मदत केली असा व्हिडीओ मुश्रीफ यांच्या समर्थकांनी व्हायरल केला आहे. दुसरीकडे, वणव्यामध्ये मित्र गारव्यासारखा म्हणत मुश्रीफ हे मित्र सतेज पाटील यांच्या मदतीला धावल्याचा व्हिडीओ समरजित घाटगे यांच्या समर्थकांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ विरुद्ध घाटगे संघर्ष आताच सुरू झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराज तीन लाख मतांनी निवडून येतील असं वाटलं होतं
या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी भूमिका मांडली आहे. संजय मंडलिक यांच्या मताधिक्यावरून आरोप प्रत्यारोप करण्याची गरज नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, मंडलिक गटाचे कार्यकर्ते तालुक्यातील गावागावात आहेत. त्यांना माहित आहे कोणी प्रामाणिकपणे काम केले. दरम्यान, यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं मला वाटत होतं. त्यांनी सांगितले की, महाराज तीन लाख मतांनी निवडून येतील असं वाटलं होतं पण ते एक लाख 48 हजार मतांनी निवडून आले. आमच्या लोकांनी काम केले की नाही हे लोकांनी पाहिलं, त्यामुळे कोणाला पुरावा देण्याची गरज नाही.
मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं असा आवाहन केलं
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं, असा आवाहन करत आम्ही प्रचार करत होतो. मोदी यांनी दहा वर्षात केलेली कामेही सुद्धा महत्वाची आहेत. जागा थोड्या कमी असल्या, तरी पुन्हा एकदा एनडीए सरकार येत आहे याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे
दरम्यान, राज्यात अकरा जागा महायुतीच्या शक्तिपीठ महामार्गामुळे गेल्या आहेत.कोल्हापुरातही त्याचा फटका बसला आहे. आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटून हा महामार्ग रद्द करायला लावू, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या