कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी काल (15 एप्रिल) जोरदार शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.


संजय मंडलिकांच्या संपत्तीत साडे पाच कोटींची वाढ 


कोल्हापूरची खासदार संजय मंडलिक यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 5 कोटी 65 लाखाने वाढ झाली आहे. यामध्ये जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख 32 हजार 525 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. मंडलिक यांच्याकडे 13 कोटी 21 लाख 95 हजार 873 रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 इतकी आहे. मंडलिक यांच्या नावावर तीन कोटी 40 लाख 440 रुपये कर्ज आहे.


मंडलिक यांनी स्वसंपादित केलेल्या स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत 1 कोटी 15 लाख 73 हजार असून स्थावर मालमत्ता विकासाचा बांधकामाचा खर्च दोन कोटी 87 लाख 73 हजार 528 आहे. चालू बाजार किंमत 1 कोटी 76 लाख 85 हजार 475 इतकी आहे. स्वसंपादित मूल्य एकूण चार कोटी एक लाख 45 हजार 353 रुपये इतके आहे. वारसामूल्य एकूण 9 कोटी 20 लाख 91 हजार 520 रुपये आहे. खासदार मंडलिक यांच्या पत्नी वैशाली यांच्या नावे जंगम मालमत्ता 37 लाख 23 हजार 381 रुपये आणि स्थावर मालमत्ता 20 लाख 38 हजार 850 रुपये किमतीची आहे. स्वसंपादित केल्या मालमत्तांची खरेदी किंमत 5 लाख 25 हजार आहे. अंदाजे चालू बाजार किंमत 20 लाख 38 हजार 850 रुपये आहे. पत्नी वैशाली यांच्यावर 70 हजार 900 रुपयांचा कर्ज आहे. दोघांकडे 35 लाख 92 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आहेत.


धैर्यशील मानेंच्या संपत्तीत झाली घट


दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे कोट्यधी असले तरी 2019 च्या तुलनेत 30 लाखाची संपत्तीत घट झाल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. माने यांनी सादर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर व जंगम मालमत्ता 4 कोटी 45 लाख 61 हजार 828 रुपये इतकी आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 30 लाखांनी घट झाली आहे. खासदार माने यांची स्थावर मालमत्ता 3 कोटी 58 लाख रुपयांची आहे. जंगम मालमत्ता 87 लाख 60 हजार 828 रुपयांची आहे. त्यांच्यावर 2 कोटी 19 लाख 75 हजार 627 रुपयांचे कर्ज आहे. सोन्याचे दागिने सुमारे 7 लाख 12 हजारांचे आहेत. 2019 मध्ये खासदार माने यांची संपत्ती 4 कोटी 75 लाख 82 हजार 862 रुपयांची होती. 


इतर महत्वाच्या बातम्या