कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून विराट शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीसाठी थंड थोपटले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शेट्टी यांची दसरा चौकातील मैदानावर सभा पार पडली. यावेळी बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि जयंत पाटील तसेच सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली.
खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात
आपल्या विरोधात साखर कारखानदार एकवटल्याचे शेट्टी म्हणाले. भाषण संपल्यानंतर राजू शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. राजू शेट्टी यांनी बोलताना सांगितले की, खोक्याचा बाजार करणारे झुंडी एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत माझ्यासोबत आहेत. ते पुढे म्हणाले की, आज लोकसभेसाठी चौथ्यांदा स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.
सगळे कारखानदार हातकणंगलेमध्ये काड्या करत सामील झाले
त्यांनी पुढे सांगितले की, देशांमध्ये बेरोजगारीची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यामुळे आर्थिक धोरणे बदला, त्याशिवाय बेरोजगारी हटणार नाही असे यावेळी सांगितले. दरम्यान, बेरोजगारीवर निवडून आल्यानंतर संसदेत आवाज उठवू असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, सगळे कारखानदार हातकणंगलेमध्ये काड्या करत सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार नव्हते. मात्र, कुठून चाव्या फिरल्या माहित नाहीत. यामध्ये जयंत पाटील, सतेज पाटील असतील, असा आरोपही त्यांनी केला. शेवटी ठाकरे यांनी हातकणंगलेमध्ये उमेदवार दिल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
मी ईडीला हिंगलत नाही, मला नोटीस पाठवावी एकदा
शेट्टी यांनी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर कार्यकर्त्यांना नोटिसा काढल्याने तोफ डागली. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी रडीचा डाव बंद करावा. कार्यकर्त्यांना नोटीसा दिल्या गेल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की विरोधकांमधील काहीजण ईडीला घाबरून भाजपमध्ये जात आहेत. मात्र, मी ईडीला हिंगलत नाही. मला नोटीस पाठवावी एकदा असे आव्हानही शेट्टी यांनी दिले. ईडी कार्यालय विरोधात मोर्चा काढावा अशी परिस्थिती असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढे विद्यार्थी आणि बेरोजगारांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या