कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जे काम सुरू आहे त्यामध्ये तळागाळातील लोकांना लाभ देण्याचे काम चाललं आहे. मोदी साहेबांच्या कामाला विरोध करण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा आज महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली. 






लोकशाहीमधील ही शेवटची निवडणूक म्हणून टीका केली जाते


ते म्हणाले की, त्यांच्याकडे कोणताही नेता नाही, त्यामुळे विरोधक मोदींवर टीका करत असतात. त्यांनी पुढे सांगितले की निवडणूक जवळ आल्यानंतर घटना बदलणार अशी टीका केली जाते. मात्र, यामध्ये जरा देखील तथ्य नाही. आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली असून त्यावेळी कळलं सुद्धा नाही. लोकशाहीमधील ही शेवटची निवडणूक म्हणून टीका केली जाते. त्यामधून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले. मात्र, असं काही होणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 






मनसेने देखील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला


ते पुढे म्हणाले की, मनसेने देखील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. अजित पवार यावेळी बोलताना महायुतीमधील सुंदोपसुंदीवर कान टोचले. ते म्हणाले की, सहकारातील निवडणुका या एकमेकांविरोधात लढल्या असतील. मात्र, ही निवडणूक लोकसभेची आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कुठेही गाफील राहू नका, समोरचा उमेदवार तुल्यबळ असल्याचे समजुनच डावपेच आखावे लागतील. यामध्ये आपल्या जातीपातीचा, नात्यागोत्याचा असा कोणताही विचार करू नका असं त्यांनी यावेळी सांगितले. ही लोकसभेची निवडणूक आहे गावकी, भावकीची निवडणूक नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. 


दुसरीकडे, सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 2014 आणि 2019 साली सुपडासाफ झाला आता देखील सुपडासाफ होणार आहे. जब तक सूरज चांद रहेगा, संविधान नहीं बदलेगा. कोल्हापुरात ही भव्य रॅली म्हणजे फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या