Shahu Maharaj: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या 149 व्या जयंतीदिनी कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शाहू समाधीस्थळाच्या विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. 


मुस्लीम रिक्षाचालकाकडून मोफत प्रवास 


शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी कोल्हापुरातील एका मुस्लीम रिक्षाचालकाने जयंतीनिमित्त मोफत सेवा दिली. या सेवेचं उद्घाटन शाहू महाराज यांनी केले. यावेळी शाहू महाराज स्वतः रिक्षामध्ये पुढील सीटवर बसले, तर मागे खासदार धनंजय महाडिक देखील बसले होते.


पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन


दुसरीकडे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन 


दुसरीकडे, कोल्हापुरातील दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास शाहू महाराज छत्रपती यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कोल्हापुरातील विविध शाळांकडून आणि संघटनांकडून लेझीम, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, पथनाट्य सादर करण्यात आले. राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची दिंडी देखील यावेळी काढण्यात आली. 


कोल्हापूर टार्गेट आहे, मात्र कोल्हापूरला कोणतीही गोळी लागू शकत नाही


कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता तो लागला, पण आपण पुसून टाकू. दंगल केवळ कोल्हापुरात नाही संभाजीनगरमध्ये घडली, अहिल्यानगरमध्येही झाली. नाशिकमध्येही काही तरी घडलं. कोल्हापूरला तर टार्गेट केल आहे. मात्र, ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार शिव शाहू सद्भावना रॅलीनंतर झालेल्या सभेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला. कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून रविवारी शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीनंतर झालेल्या सभेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपले परखड मत व्यक्त करताना गेल्या 100 वर्षात कोल्हापूरला डाग लागला नाही तो 7 जून रोजी लागल्याचे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या