Kolhapur News: पुरोगामी कोल्हापूर पुरोगामीच राहणार, शिव शाहूंचा विचार अन् एकोप्याचा हुंकार; सद्भभावना रॅलीतून समतेचा जागर
महापुरुषांच्या घोषणा तसेच जगात भारी, आम्ही कोल्हापुरी अशा मजकुराच्या परिधान केलेल्या टोप्या आणि सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देत कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाले आणि सामाजिक ऐक्याचा नारा बुलंद केला.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली.
प्रारंभी सर्व नेत्यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर सद्भावना रॅलीला सुरुवात झाली.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या सद्भावना रॅलीचे नेतृत्व केले.
टाऊन हॉल परिसर, सीपीआर, महापालिका ते छत्रपती शिवाजी चौक अशी यात्रा निघाली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, शाहू फुले आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रॅली मार्ग दणाणून सोडला.
शाहूंचे कोल्हापूर-पुरोगामी कोल्हापूर, पुरोगामी कोल्हापूर पुरोगामीच राहणार या घोषणा लक्षवेधी ठरल्या.
यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसर येथे मान्यवरांची भाषणे झाली. सर्वांनीच कोल्हापुरात सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेचा विचार जिवंत ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोल्हापूरला तर टार्गेट केलं आहे. मात्र ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे, कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.
शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूरला 100 वर्षांत जो डाग लागला नव्हता तो लागला, पण तो आपण पुसून टाकू.
6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याच दिवशी स्टेट्स प्रकरण घडले. पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले. ती मुलं अल्पवयीन होती. मात्र, त्यांना माफ करता येतं नाही आणि त्यांच्या पालकांनाही माफ करता येतं नाही. कारण त्यांनी त्या मुलांना योग्य संस्कार केले नाहीत, असेही शाहू महाराज म्हणाले.
सामाजिक सलोख्याचा विचार देशभर पोहोचला पाहिजे कारण जे कोल्हापुरात घडतं ते सर्वत्र घडतं. समतेचा विचार पुढे नेऊया आणि कृतीतून तो पुढे नेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.