Hasan Mushrif: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी पत्नी व मुलासह आत्महत्या केली. माजी कामगार आमदार हसन मुश्रीफ यांनी संतोष शिंदे यांच्या घरी रविवारी (25 जून)भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा शिंदे, बहीण प्रतिभा मांडेकर आणि नातलगांनी हंबरडा फोडला. संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी माझ्या नातवाचा दोष तरी काय? असे म्हणत आक्रोश केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनाही अश्रु अनावर झाले. 


माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता?


मुश्रीफ शिंदे यांच्या घरी पोहोचताच शहरातील प्रमुख नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक गजानन सरगरही पोहोचले. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी हंबरडा फोडला. त्या रडतच सांगत होत्या, "माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेलं आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवानं काय गुन्हा केला होता," असे म्हणताच मुश्रीफ यांनाही अश्रु अनावर झाले. 


सर्व आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा झालीच पाहिजे 


यावेळी शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करत खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक सरगर यांना मुश्रीफ यांनी दिल्या. जोपर्यंत या गुन्ह्यातील आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत शहर अस्वस्थच राहिल, असे मुश्रीफ म्हणाले. 


सर्वपक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार


यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री दीपक केसरकर यांना भेटणार आहेत, त्यांची भेट घालून द्या, अशी मागणी उपस्थितांनी मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी केसरकर यांना फोन करुन वेळ निश्चित केली. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांची भेट घेणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीशराव पाटील- गिजवणेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, जनता दलाचे नितीन देसाई व संजीव रोटे, दीपक कुराडे, प्रकाशभाई पताडे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, राजू जमादार, राहुल शिरकोळे आदी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या