Kolhapur News: सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काहीवेळा अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर भेटणे हे सुद्धा कधी कधी आपल्या कामापेक्षाही मोठा भाग असतो. सगळेच या प्रकारात येत नसले, तरी जे कोणी लेट बहाद्दर असतात त्याचा राग इतर सहकाऱ्यांना येतच असतो. असाच राग एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला आल्याने बदली झाल्यानंतर थेट निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जाब विचारून सत्कारमूर्तीच्याच कानाखाली जाळ काढल्याची घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या कानशिलात कार्यक्रमाची बदलीपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे.  


बदलीचा कार्यक्रम राहिला बाजूला, दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये कानाखाली जाळ काढण्याच्या कार्य्रकमाने कर्मचारी मात्र भेदरून गेले. अखेर कर्मचाऱ्यांनीच वाद थांबवल्यानंतर तसेच वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. मात्र, कानशिलातचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहिलेल्या कर्मचाऱ्यांनी याला दुजोरा दिला. दरम्यान, कानाखाली बदलीच्या कार्यक्रमाचा पार पचका करून टाकणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर माफी मागून वादावर पडदा पाडल्याची माहिती समोर आली आहे. 


सेवेत असताना कधीच वेळेत नाहीत 


संबंधित दोन वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांमधील एक वैद्यकीय अधिकारी आपल्या चार वर्षांच्या सेवाकाळात कधीच कार्यालयात वेळेत हजर झाल्या नाहीत. प्रमुख असलेल्या महिला अधिकाऱ्यांकडे गगनबावडा तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे वर्ग दोन असलेल्या महिला अधिकाऱ्यावर कामाचा ताण चांगलाच पडला होता. दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चार वर्षांनी झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून दोन्ही महिला अधिकाऱ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.  यामध्ये पहिल्यांदा कामाचा अतिरिक्त ताण पडलेल्या वर्ग दोनमधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पाच दिवसांपूर्वी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर शुक्रवारी प्रमुख अधिकारी असलेल्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. 


भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक अन् कानशिलातचा कार्यक्रम  


निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त कामाचा ताण सहन केलेल्या आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम होऊन वर्ग दोनमधील महिला वैद्यकीय अधिकारी सुद्धा हजर झाल्या. यावेळी दोघींमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वाद वाढल्यानंतर थेट कानशिलात देण्यात आली. राग थंड झाल्यानंतर कानशिलात वाजवणाऱ्या महिलेने माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. तसेच वरिष्ठांनी सुद्धा हस्तक्षेप केल्याने प्रकरण पोलिसापर्यंत गेले नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या