Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील (Kagal) सिद्धनेर्ली पैकी नदीकिनारा या ठिकाणी आज (1 जुलै) सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांना दुधगंगा नदीपात्रात चार मानवी कवट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी पोलीस पाटील उद्धव पोतदार यांना माहिती दिली. पोलीस पाटील पोद्दार यांनी तत्काळ कागल पोलिसांना घटनेची माहिती दिली. कागल पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पाहणी करून नदीपात्रातील मानवी कवट्या ताब्यात घेतल्या. 


एकाचेवळी चार कवट्या आढळल्याने खळबळ


दुधगंगा नदीपत्रात पाऊस लांबल्याने पाणी कमी झाले आहे. यामुळे सकाळी पोहण्यास गेलेल्यांना चार कवट्या दिसून आल्या. एकाच ठिकाणी चार मानवी कवट्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे दुधगंगा नदी पात्रामध्ये कवट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.


अघोरी कृत्य की घातपात?


काही दिवसांपूर्वीच सिद्धनेर्ली, बामणी या गावामध्ये परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आले होते. आता एकाच ठिकाणी चार कवठा आढळून आल्याने हा अघोरी कृत्याचा तरी प्रकार नाही ना? याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अन्यत्र घातपात करून याठिकाणी कवट्या आणून टाकलेल्या नसाव्यात ना? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


शेतामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ


दुसरीकडे, जून महिन्याच्या सुरुवातीला कागल तालुक्यामधील बामणी गावच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खुनाचा कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 24 तासात छडा लावण्यात आला होता. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच खून केल्याची घटना घडली होती. अमरसिंह दत्ताजीराव थोरात अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर एलसीबीने मयत अमरसिंहचे वडिल दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात या दोघांना अटक केली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत. 


कागल निढोरी राज्य मार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी डोक्यात प्रहार केल्याचे दिसून येते होते. त्यामुळे खून अन्य ठिकाणी करून मृतदेह आणून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात सातत्याने भांडणे होत होती. अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याला पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला होता. यामुळे घरात वाद झाला होता. याच वादातून वडिलांनी घरामध्ये अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. या मारहाणीत  प्रचंड रक्तस्रावाने अमरसिंहचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी घाबरून बामणी हद्दीतील शेतात आणून मृतदेह टाकला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या