Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि निलंबित एपीआय राहुल राऊत या दोघांच्या पोलिस कोठडीत आज एक दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा उद्या शनिवारी (1 जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
संतोष शिंदे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांनी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शुभदा पाटील आणि राहुल राऊतने खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास दिल्याचा उल्लेख केला होता. शिंदे यांच्या आत्महत्येनंतर शुभदा पाटील व राहुल फरार झाले होते. त्यांना सोलापुरातून कोल्हापूर पोलिसांच्या टीमने उचलले होते. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांच्यासमोर त्यांना उभे करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या पुण्यातील दोघेजण अजूनही फरारी आहेत.
23 जून रोजी उद्योजक संतोष शिंदे, पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जून यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये विष प्राशन करून व गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.
विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजी राणे यांना नियुक्त करा
दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजी राणे यांना नियुक्त करावे, अशी मागणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत राणे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली. राणे यांना फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घालण्याची लेखी विनंती करण्यात आली. राणे यांनी विनंती मान्य केली आहे. विशेष वकील म्हणून नियुक्तीबाबत सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठी संमतीपत्रही अॅड. राणे यांनी दिले आहे.
एपीआय राऊत निलंबित
दुसरीकडे, उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय राहुल राऊतला निलंबित करण्यात आले आहे. त्याला निलंबित केल्याची माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही निलंबनाची कारवाई असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या