Bidri Sakhar Karkhana: बिद्री साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु असतानाच पावसाचे कारण करुन राज्य सरकारकडून निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याने वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठवावी आणि कारखान्याची निवडणूक त्वरीत घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सत्ताधारी गटाकडून उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सलग दोन दिवस सुनावणी पार पडली आहे. गुरुवारी विरोधी गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर काल सत्ताधारी गटाकडून म्हणणे मांडण्यात आले. शुक्रवारच्या सुनावणीवेळी विरोधी आमदार प्रकाश आबिटकर गटाचे वकील अनुपस्थित राहिल्याने उर्वरित सुनावणी मंगळवारी 27 जून रोजी होणार आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
मंगळवारच्या सुनावणीसाठी आमदार आबिटकर यांच्या वकिलांनी हजर राहावे, अन्यथा त्यांच्या अनुपस्थितीत निकाल देण्यात येईल, असे तोंडी आदेश खंडपीठाने दिल्याची माहिती सत्ताधारी गटाचे वकील अॅड. श्रीनिवास पटवर्धन यांनी दिली.
पावसाचे कारण सांगून निवडणूक पुढे ढकलली
दुसरीकडे, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मागणी केली होती. ऐन पावसाळ्यात बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील पावसाचे प्रमाण लक्षात निवडणूक लांबणीवर टाकण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक 30 सप्टेंबर 2023 नंतरच होईल.
मतदानासाठी 'अ' वर्ग उत्पादक सभासद मतदार 55 हजार 65 इतके आहेत, तर 'ब' वर्ग संस्था गटासाठी 1022 व चार व्यक्ती असे मतदार पात्र ठरले आहेत. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी संपल्याने सध्या काळजीवाहू संचालक मंडळ काम करत आहे. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची संख्या 21 वरुन 25 करण्यात आली आहे. कारखान्याचे राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील 218 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
दुसरीकडे, ब्रिदी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्याचे कारण सांगून लांबणीवर पडली असतानाच भोगावती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम मात्र जाहीर झाला आहे. भोगावती साखर कारखान्यासाठी (Bhogawati Sakhar Karkhana) 20 जूनपासून रणधुमाळी सुरु झाली आहे. 30 जुलै रोजी मतदान होणार असून 31 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी कारखाना निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या