Kolhapur Weather Update: गेल्या महिनाभरापासून चातकाप्रमाणे वाट पाहिलेल्या वरुणराजाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Weather Update) आगमन केले आहे. गुरुवारी राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. पाऊसच झाला नसल्याने आज कोसळलेल्या किंचित दिलासा देणाऱ्या असल्या, तरी अजूनही दमदार सलामीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. 


जिल्ह्यात शेतीची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. धरणांमध्येही केवळ मृतसाठा असल्याने आता तो केवळ पिण्याचा पाण्यासाठीच वापरला जाणार आहे. त्यामुळे शेती संकटात सापडली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णतः दडी मारली आहे. त्यामुळे केलेल्या पेरण्या तसेच उभी पिके संकटात आली आहेत. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रामध्ये पाऊस होईल अशी शक्यता धरून बळीराजा पेरणी केली होती. मात्र, मृग नक्षत्रात एक थेंबही कोसळत नसल्याने केलेल्या पेरण्या संकटात आल्या आहेत. 


25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज 


दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 25 आणि 26 जून रोजी कोल्हापूर आणि सातारामध्ये घाटमाथा परिसरासह जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास पुन्हा एकदा खरिपाच्या हंगामास वेग येण्याची शक्यता आहे. 


जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी शेतीची मशागत करून ठेवली आहे. मात्र, पाऊसच नसल्याने शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा नसल्याने सोयाबीनची पेरणी केलेली नाही. तसेच भुईमुगाची पेरणी केली नाही. जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के पेरण्या प्रलंबित आहेत. जोवर दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून तसेच कृषी विभागाकडून जिल्ह्यातील बळीराजाला करण्यात आलं आहे. 


जोपर्यंत सलग तीन दिवस पाऊस जिल्ह्यामध्ये होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पेरणी करण्यासाठी घाई करू नका, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे. त्यामुळे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामधील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करत चालला आहे. जिल्ह्यासाठी प्रमुख असलेल्या आठ धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला गेला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या