Kolhapur News : पंचगंगा (Panchganga River) आणि भोगावती (Bhogawati River) नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागांत शेतीसाठी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत. उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असा इशारा बांदिवडेकर यांनी दिला आहे. 


राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग. तुळशी धरणापासून ते बीड बंधाऱ्यापर्यंतचा भाग, कुंभी धरणापासून भोगावती नदी संगमापर्यंतचा भाग, कासारी धरणापासून प्रयाग चिखली संगमापर्यंतचा भाग, नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रावर 18 ते 20 एप्रिल 2023 असे तीन दिवस उपसाबंदी करण्यात येत आहे. शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापासून ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरावरील भगामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रासाठी 21 ते 23 एप्रिल असे तीन दिवस उपसाबंदी करण्यात येत आहे.


दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये उपसाबंदी


दरम्यान, दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये तसेच दुधगंगा नदी आणि कालवा भागात मिळणाऱ्या सर्व ओढे आणि नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


दुधगंगा नदी उपसाबंदी क्षेत्र पुढीलप्रमाणे


दुधगंगा उजवा मुख्य कालवा (लिंगाचीवाडी ते बिद्री कालवा दुभाजक)-  दि. 23 ते 27 एप्रिल असे 5 दिवस आणि दुधगंगा नदी ( बिद्री ते दत्तवाड बंधारा)  26  ते 28 एप्रिल 2023 असे 3 दिवस उपसांबदी राहील.


एप्रिलपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोल्हापूर आणि परिसरातील नदीकाठच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन ते चार टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. राधानगरी धरणामध्ये 3.37 टीएमसी पाणी शिल्लक आहे. गैबीमध्ये एक टीएमसी पाणी उपलब्ध आहे. तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतून किमान अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा असला तरी पावसाळा लांबला तर मात्र, पाण्याची फार टंचाई भासू शकते. त्यामुळे नियोजन सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या